421 वर्षांत पहिल्यांदाच वारकर्‍यांच्या हस्ते दहीहंडी फोडून नाथ षष्ठी यात्रेची सांगता

Foto
पैठण : शांतिब्रह्म संत शिरोमणी संत एकनाथ महाराज यांच्या नाथ षष्ठी सोहळ्याच्या 421 वर्षांच्या इतिहासात वारकरी, भाविकांच्या आग्रहास्तव प्रथमच हजारो भाविकांच्या उपस्थितीत काल्याची दहीहंडी फोडण्याच्या बहुमान वारकर्‍याला मिळाला आहे. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी ‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री नामदेव तुकाराम, संत एकनाथ महाराज की जय...’असा एकच जयघोष केला. या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दणाणला होता. नाथ षष्ठी सोहळ्याच्या 421 वर्षांच्या इतिहासात प्रथमच काल्याच्या दोन दहीहंडी फोडण्यात आल्या.
काल्याची दहीहंडी फोडल्यानंतर वारकरी, भाविकांनी काल्याचा प्रसाद घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. काल्याचा प्रसाद एकमेकांना देऊन आता पुढच्यावर्षी भेटू, असा निरोप देत वारकरी व भाविकांनी पैठण नगरीचा निरोप घेतला. दरम्यान, नाथ मंदिरामध्येसुद्धा मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत नाथ वंशजांच्या हस्ते काल्याची दहीहंडी फोडण्याची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाथ षष्ठी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्याचा परिणाम यात्रेवर मोठ्या प्रमाणात झाला. नाथ षष्ठी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंधरा दिवसाआधीच राज्याच्या कानाकोपर्‍यातून सुमारे पाचशे ते साडेपाचशे दिंड्या पैठणकडे रवाना झाल्या होत्या. यामध्ये लाखोच्या संख्येने वारकरी व भाविक सहभागी झाले होते. मात्र, नाथ षष्ठी सोहळा रद्द करण्यात आल्यामुळे वारकरी, भाविक यांची मोठी निराशा झाली. असे असले तरी वारकर्‍यांच्या दिंड्या पैठण तालुक्यात विविध गावात मुक्‍कामी थांबल्या. केवळ वारकर्‍यांनी नाथ मंदिरात नाथ समाधीचे दर्शन घेऊन पैठणचा निरोप घेतला. काल दहीहंडीच्या सोहळ्यासाठी हजारो भाविक प्रशासनाचा आदेश धुडकावून या सोहळ्यात सहभागी झाले होते.
हा सोहळा पाहण्यासाठी राज्याचे फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, नाथ संस्थानचे विश्‍वस्त दादा बारे, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, जि. प. सदस्य विलास भुमरे, अक्षय जायभाय, शहादेव लोहारे, प्रा. चंद्रकांत भराट, नामदेव खरात, विजय सूते, अमोल जाधव, देविदास पठाडे, सुरेश शेळके, शिवराज पारिक, भाऊसाहेब चोरगे आदींसह हजारोच्या संख्येने पुरुष, महिला भाविक उपस्थित होते.
तसेच नाथ मंदिरात तहसीलदार चंद्रकांत शेळके,उपविभागीय पोलिस अधिकारी गोरक्षनाथ भामरे, पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, नगराध्यक्ष सूरज लोळगे आदींची उपस्थिती होती. नाथ मंदिरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हनुमंत घावटे या वारकर्‍याला मिळाला दहीहंडी फोडण्याचा मान
नाथ षष्ठी सोहळ्याच्या 421 वर्षांच्या इतिहासात यंदा प्रथमच काल्याच्या दोन दहीहंडी फोडण्यात आल्या. नाथ मंदिरात नाथ वंशजांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली, तर वारकरी, भाविकांच्या  मागणीचा  विचार करून  तसेच दहीहंडीचा सोहळा वारकरी, भाविकांना डोळे भरून पाहता यावा यासाठी  नाथ संस्थानच्या वतीने मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर दहीहंडी बांधण्यात आली होती. नाथ मंदिराबाहेरील दहीहंडी फोडण्याचा मान वारकर्‍याला देण्यात आला. हा मान औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील हनुमंत घावटे या 80 वर्षीय वारकर्‍याला मिळाला. नाथ सोहळ्याच्या 421 वर्षांच्या इतिहासात प्रथमच वारकर्‍यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. 


Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker